इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा काँग्रेस पक्ष हाच भ्रष्टाचाराचा जनक आहे. यामुळे इतर पक्षांवर गलिच्छ आरोप करून राजकारण करणाऱ्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले आहे.
शुक्रवारी शहरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी काँग्रेस नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सरकारने वैद्यकीय उपकरण खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा अशा नेत्यांनी करणे योग्य नसून अशी वक्तव्य करणे हे अशोभनीय असल्याचे मतही यावेळी अंगडींनी व्यक्त केले.
कोविड महामारीसारख्या समस्या आवासून समोर उभ्या असून याकाळात गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडविण्यात आणि होत असलेल्या गैरसोयी दूर करण्यात नेत्यांनी लक्ष द्यावे, आणि राजकारण बाजूला सारून देशावर ओढवलेल्या संकटात हातभार लावून संकट दूर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे. परंतु सूडबुद्धीने राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे अंगडी म्हणाले.
देशपातळीवर मोदी सरकार आणि राज्य पातळीवर येडियुरप्पा सरकार योग्यपद्धतीने काम करीत असून राजकारण आणि खोटारडे आरोप करून वातावरण गढूळ करण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने करण्यात येत आहे. हे सर्व वेळीच थांबवावे अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या बीम्स समोरील रुग्णवाहिका आणि डॉक्टरांवरील हल्ल्याचाही निषेध अंगडी यांनी केला. तसेच कोरोनाकाळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्व कोरोनायोध्यांचे कार्य कौतुकास्पद असून अशापद्धतीने दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.