समिती ही पक्ष नसून विचारधारा आहे मराठी मनाच्या अस्मितेच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे. त्याची चौकट मराठी हिताच्या भोवतीच बंदिस्त आहे.या चौकटीला छेद देत विकासाचे बहाणे करत,त्यांच्या शिवाय काही कामे अडतात अशी कारणं सांगत हे तथाकथित नेते राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी सलगी करत आहेत.
समितीचे हे जन आंदोलन आहे, हा कोणता पक्ष नव्हे, समितीचे जे स्वतःला पदाधिकारी मानतात ते संघटनेच्या सोयीसाठीचे पदाधिकारी आहेत, त्यांचा अधिकार फक्त समितीत सुसूत्रता ठेवणे इतकाच आहे. पण वर्षानुवर्षे पदाधिकाऱ्यांचे बिल्ले लाऊन समितीच राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला घाणवट ठेवण्यासाठी निघालेले आहेत ,ह्यांच्या आस्थापनांची उदघाटने, प्रमुख कार्यक्रमात राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना वाटलेली अध्यक्षपदे, लिटीगेशन मध्ये असलेल्या जागा मुक्त करण्यासाठी परस दाराने राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी वाढवलेली घसट हे म्हणजे समितीच्या आत्म्यालाच लावलेला काटा आहे.
एका गटातून दुसऱ्या गटात नेहमी कोलांटी उड्या मारणारा, कृष्ण कृत्य करणारा नेहमीच संघटनेला बाधक ठरलेला ,सफेद कपडे काळी दाढी वाला राष्ट्रीय पक्षांचा दलाल रेस कोर्सवर समितीचा बल्ल्या करण्यासाठी गेला होता. याला भर बैठकित खुला जाब जेष्ठ नेते एन डी पाटील यांनी विचारला होता. समितीचा मूळ उद्देश्य पैसा नसून लढा आहे ही कान पिचकी त्याला दिली होती, पण सरावलेला नेता पैशाचे मांडे मनात खात गप्प बसला.
आज ग्रामीण भागातल्या पावशेर नेत्याला आपल्या राजमहलाच्या भिंती काट्या सारख्या टोचायला लागल्या आहेत. बेळगाव live ने फाडलेला बुरखा जगा समोर आणलेला चेहरा ,सगळ्यांना फोन करून तो झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
बेळगाव live ने समिती सॅनीटाईज करण्याचा प्रयत्न चालवला आहे.समितीला लागलेला कोरोना नक्कीच नामशेष होईल आणि उद्याच्या पहाटेची वाट बघत असलेल्या नव्या दमाच्या युवकांच्या कडे समितीची सूत्रे येतील आणि मराठीचे सुदिन येतील …
क्रमशः…
(ग्रामीण समितीला भेद करणाऱ्या 70 जणांच्या टोळक्याचं कृत्य या मालिकेतील शेवटचा अध्याय असेल)