कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि पूर परिस्थिती संबंधी चर्चा केली.
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्या बरोबरच कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि आयोगाचा निवाडा अद्याप राजपत्रात प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे पाणी वाटप सध्या शक्य होत नाही.यासाठी आयोगाचा निवाडा राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणण्याबद्दल सहमती दर्शवली.
आलमट्टी धरणा संदर्भात दोन्ही राज्यात तीन समन्वय समित्या स्थापन करण्याचा विचार असून अभियांत्रिकी, सचिव आणि मंत्री स्तरीय समित्या असणार आहेत. संभाव्य पुरा बद्दल योग्य समन्वय राखून दोन्ही राज्ये एकमेकांना कसे अलर्ट देतील यावर देखील चर्चा करण्यात आली.गेल्या 20 वर्षात कृष्णाखोऱ्यात आणि आलमट्टी धरणात विविध बांधकाम झाली आहेत त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत अश्या अडथळ्यांचे ऑडिट देखील होणार आहे
दरवर्षी पावसाळ्यात उदभवणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला कर्नाटक सरकारनेही मान्यता दिली.उन्हाळ्यात महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी सोडले जाते.भविष्यात पाणी दिल्याबद्दल पैशाची देवाणघेवाण न करता एकमेकांना पाणी देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राने मांडला.
यावेळी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी,वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री श्रीमंत पाटील,आमदार महेश कुमठळ्ळी आदी उपस्थित होते.महाराष्ट्रातर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,मंत्री राजेंद्र पाटील ,यड्रावकर,सतेज पाटील,विश्वजित कदम,बाळासाहेब पाटील, खासदार संजयकाका पाटील,धैर्यशील पाटील, विश्वजीत कदम आमदार राजेश पाटील,कर्नाटकचे अप्पर मुख्य कार्यदर्शी राकेश सिंह, पाटबंधारे खात्याचे अधिकारी रुद्राय्या, पाटबंधारे कार्यकारी सचिव मल्लिकार्जुन उपस्थित होते.