संपूर्ण जगावर आक्रमण करून आपला विखारी विळखा घालणाऱ्या कोरोनाच्या आव्हानाला नवोदित युवा डॉक्टरांनी कणखरपणे सामोरे जावे आणि या रोगाची लढा द्यावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केले.
के एल ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऑफ रिसर्च अर्थात काहेर विद्यापीठाचा 10 वा पदवीदान समारंभ लाॅक डाऊनचे पालन करून नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यानात्याने मंत्री डाॅ. सुधाकर बोलत होते. बेंगलोर येथून डिजिटल व्यासपीठावरून डॉ. सुधाकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ प्रभाकर कोरे हे होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर पुढे म्हणाले की, आपल्या देशात 70 टक्के जनता ग्रामीण भागात राहते, जी वैद्यकीय सुविधा व डॉक्टरांपासून वंचित आहे. या भागाला वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी देण्यासाठी पदवी पूर्ण केलेल्या युवा डॉक्टरांनी किमान 5 वर्षे ग्रामीण भागात सेवा करावी. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. वैद्यकीय क्षेत्रात सतत घडामोडी संशोधन आणि नवीन प्रवाह येत असतात. त्यांचा डॉक्टरांनी सतत अभ्यास केला पाहिजे. समाज सुद्धा डॉक्टरांना देवदूत मानतो. पदवीमुळे तुमच्या पेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र समाजाला डॉक्टरांकडून खूप अपेक्षा आहेत. कोरोनाशी भारतातील डॉक्टरांनी कणखर सामना केला आहे. त्यामुळे सर्व भारतीय डॉक्टर प्रशंसेस पात्र आहेत, असेही सुधाकर म्हणाले. अखेर केएलई संस्थेबद्दल गौरवोद्गार काढून वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ सुधाकर यांनी सर्व पदवीप्राप्त डॉक्टरांचे अभिनंदन केले.
कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी राज्याबाहेर काहेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट विद्यापीठ आहे. विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी थॉमस जेफर्सन विद्यापीठातून 8 ते 10 विद्यार्थी या विद्यापीठात शिकण्यास येतात. पुढील वर्षी मुंबईमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल तर बेंगलोरमध्ये ॲस्टर ग्रुपच्या सहकार्याने हॉस्पिटल होणार आहे, असे सांगितले. तसेच पुणे हॉस्पिटल बेळगाव कॅन्सर हॉस्पिटलचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे, अशी माहितीही डॉ. सावजी यांनी दिली.
पदवीदान समारंभात डाॅ. शिवानी मरेगुड्डी, डाॅ. विशाल कुलगोड व डाॅ. संदेश जोशी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे सुवर्णपदक पटकाविले. डाॅ. निहारिका सबरवाल व डाॅ. रोशन रांगणेकर यांनी बीडीएस विभागात सुवर्णपदक मिळवले. या समारंभात 44 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, 12 विद्यार्थ्यांना पीएचडी, 9 विद्यार्थ्यांना डीएम व एमसीएच, 400 विद्यार्थ्यांना पदविका, 886 विद्यार्थ्यांना पदवी, 51 विद्यार्थ्यांना डिप्लोमा पदविका, 14 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्स, 10 विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती आणि 16 विद्यार्थ्यांना डिप्लोमा पदवी देण्यात आली.
याप्रसंगी केएलई कार्यकारिणीच्या सदस्यांसह डॉ. साधुण्णावर, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, डॉ. बी. जी. देसाई, डॉ. एम. व्ही. जाली, डाॅ. निरंजना महंतशेट्टी, डाॅ. अलका काळे, डाॅ. श्रीनिवास प्रसाद आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सोशल डिस्टंसिंग पाळून पार पडलेल्या या समारंभाप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. सुनील जलालपूरे यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले. कुलसचिव डाॅ. व्ही. ए. कोठीवाले यांनी सुवर्ण पदक विजेत्यांची नांवे जाहीर केली. डाॅ. अविनाश कवी व डॉ. नेहा धडेद यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.