बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊनची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
कोरोनाचे संकट प्रचंड प्रमाणात वाढल्याने बेंगलोर शहर व ग्रामीण उद्या मंगळवार 14 जुलैपासून आठवडाभरासाठी लॉक डाऊन केले जाणार आहे. याबरोबरच राज्यातील बेळगावसह एकूण 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील लॉक डाऊनच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित 12 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची चर्चा केली.
याचप्रसंगी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आपल्या जिल्ह्यात लॉक डाऊनची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध केली जात आहे.
वृत्त वाहिन्यांकडून सदर वृत्त प्रसिद्ध केले जात असले तरी यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे राज्यातील संबंधित 12 जिल्ह्यातील लॉक डाऊनबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार? याकडे संबंधित जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.