शहरातील कोनवाळ गल्ली येथील नाल्याच्या कोसळलेल्या जुन्या भिंतीच्या ठिकाणी 51 मीटर लांबीची नवी आरसीसी भिंत बांधकामाचा शुभारंभ आज गुरुवारी सकाळी उत्साहात करण्यात आला.
कोनवाळ गल्ली परिसराच्या माजी नगरसेविका सरिता पाटील यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत महापालिकेच्या फोर्टीन फायनान्स फंडातून कोनवाळ गल्ली नाल्याच्या भिंतीसाठी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधीतून आता नाल्याच्या भिंतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 51 मीटर लांबीची आरसीसी भिंत बांधली जाणार आहे. या भिंत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. माजी महापौर आणि नगरसेविका सरिता पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कोनवाळ गल्लीतील सिंहगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गवळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तर आमदार बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करून भिंत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेविका प्रभावती गवळी, अभिजीत सुनगार, बळवंत शिंदोळकर, विनायक बेळगावकर, बाळासाहेब आदींसह गल्लीतील नागरिक आणि युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.