बेळगाव महापालिकेच्या कोनवाळ गल्ली येथील उत्तर उपविभाग -1 या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे हे कार्यालय सील डाऊन करण्याचा आदेश मनपा आयुक्त के. एच. जगदीश यांनी दिला आहे. तसेच सदर कार्यालयातील 10 जणांना काॅरंटाईन होण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोनवाळ गल्लीतील उत्तर उपविभाग कार्यालयातील कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. संबंधित बाधीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल निरीक्षकासह 10 जणांना होम काॅरंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.
गेले तीन महिने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना काॅरंटाईन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे.
कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. आता पालिका कर्मचारीच बाधित झाल्याने हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवडाभरापासून
महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु कोरोनने महापालिका विभागीय कार्यालयात शिरकावा केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.