बेळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या पर्जन्यमापन केंद्रांपैकी गेल्या 30 जून 2020 पर्यंत 314.9 मि.मी. इतकी सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यातील पर्जन्यमापन केंद्रात झाली असून बैलहोंगल तालुक्यामध्ये 91.9 मि.मी. इतका सर्वात कमी पाऊस नोंदविला गेला आहे.
खानापूर तालुक्यात दरवर्षी 30 जून 2020 पर्यंत सरासरी 376 मि.मी. पावसाची नोंद होते. मात्र यंदा येथे 314 मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली असली तरी इतर तालुक्यांच्या तुलनेत ही नोंद सर्वाधिक आहे.
विशेष म्हणजे कमी पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अथणी, रामदुर्ग, हुक्केरी, सौंदत्ती, गोकाक व चिकोडी तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. खानापुरच्या तुलनेत बेळगाव तालुक्यामध्ये मात्र यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. बेळगाव तालुक्यामध्ये जूनअखेर पर्यंत सरासरी 240 मि.मी. पाऊस पडत असतो तथापि या वेळी येथील पर्जन्यमापन केंद्रात 259.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यंदा मंगळवार दि 30 जून 2020 पर्यंत पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे सरासरी व प्रत्यक्ष) पुढीलप्रमाणे आहे. अथणी (78 मि.मी. -134.9 मि.मी.), बैलहोंगल (89 -91.9), बेळगाव (240 -259.7), चिक्कोडी (86 -199.9), गोकाक (69 -94.1), हुक्केरी (102 -129), खानापूर (376 -314.9), रायबाग (72 -182.2), रामदुर्ग 68 -126.7) आणि सौंदत्ती (87 मि.मी. -100.4 मि.मी.).