मागील तीन ते चार वर्षापासून कंग्राळी ते एपीएमसी रस्ता करावा अशी मागणी आणि या रस्त्यासाठी आंदोलन मोर्चा निवेदने सगळे देऊन झाले अखेर रस्त्याला मुहूर्त लागला. मात्र कंत्राटदाराच्या हेळसांड पणामुळे संथ गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. चिखलाने माखलेला रस्त्यावरून प्रवास करताना आपला जीव धोक्यात घेऊनच प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कंग्राळी ते एपीएमसी रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी वारंवार आंदोलने निवेदने आणि मोर्चे काढले याचबरोबर रास्तारोको केला. मात्र याचा प्रशासनाला काही परिणाम झाला असे दिसून येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे आता वर्षभर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अजूनही रस्ता अर्धवटच आहे. एका बाजूने कॉंक्रिटीकरण करण्यात आले. मात्र ते देखील अर्धवट आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मात्र आपल्या जीवाचा धोका पत्करूनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार सांगून देखील कंत्राटदार मात्र आपल्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या कामाला दिरंगाई करत आहे.
प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता तातडीने करण्यासाठी हालचाली गतिमान कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका बाजूने रस्ता करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. चिखलातून प्रवास करताना छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची कामे तातडीने करावी तसेच मागणी होत आहे.