कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या दर रविवारच्या लॉक डाऊनला आज बेळगाव शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला.
शहरात आज तिसऱ्या रविवारी देखील काटेकोर संचारबंदी पाळण्यात आली.
लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होऊन शहरातील रस्ते सुनसान झाले होते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेले मध्यवर्ती बस स्थानक आणि शहर बस स्थानकावर शुकशुकाट पसरला होता. रविवार पेठ,खडेबाजार,रामदेव गल्ली या व्यापारी आस्थापने असलेल्या गल्ल्या निर्मनुष्य होत्या. बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती.
बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आज रविवारी ही लोक डाऊन चे निर्बंध अत्यंत कठोर पूर्वक राबविण्यात आले.
पोलिसांनी सकाळपासूनच शहरातील मुख्य सर्कलमध्ये नाकाबंदी करून मार्ग रोखले होते. शहरात ठिकठिकाणी लॉक डाऊनची अमंलबजावणी करण्यासाठी पोलीस कार्यशील होते. शहराच्या कांही भागातील दूध आणि औषध दुकाने तेव्हढीच सुरू होती. त्याचप्रमाणे हॉटेलमधून पार्सल सर्व्हिस दिली जात होती. शनिवारी मटण व चिकन खरेदी करायला ज्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी आज हॉटेलमधून नॉन व्हेज पार्सल मागवून आपल्या जिभेचे चोचले पुरवले.
शहरात विनाकारण करणाऱ्यांना चाप बसावा याकरिता कांही ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्यांना अन्य पर्यायी रस्त्याने भोवाडा घालून इच्छित स्थळी जावे लागत होते. शहराबरोबरच उपनगरांमध्ये देखील तिसऱ्या रविवारी लॉक डाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. टिळकवाडी, अनगोळ, वडगांव, शहापूर, जुने बेळगाव, सदाशिनगर, शिवाजीनगर, महांतेशनगर, शाहूनगर, वैभवनगर आझमनगर आदी भागांमध्ये आज दिवसभर शुकशुकाट होता. सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले होते.