संपूर्ण राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर सरकारने आता लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु म्हणावे इतके प्रामुख्य सरकारने दिलेले दिसत नाही, यासोबतच राज्यातील मंत्रीच गायब झाले असून सध्या मंत्र्यांना शोधण्याची मोहीम सुरु करा असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्रिमंडळाने ज्या पद्धतीने बेलगावकडे लक्ष देणे गरजेचे होते तितके लक्ष दिले नाही. जितक्या बैठक होणे गरजेकत्या होत्या तितक्या बैठक घेण्यात आल्या नसून बहुतेक मंत्री हे अजूनही बंगळूरमध्येच आहेत. शिवाय आपल्या भागातही हे मंत्रीमहोदय फिरकले नाहीत. जनतेला हे सर्व ठाऊक आहे. आता यापुढील निर्णय जनताच घेईल, असे सांगून मंत्र्यांचा निषेध त्यांनी केला.
प्रत्येक आठवड्याला यासंदर्भात एक बैठक होणे गरजेचे होते. परंतु मंत्रीच जागेवर नसल्यामुळे विरोधी पक्ष, एनजीओ, जनतेच्या मागण्या आणि सल्ला या सर्वाना उत्तर कोण देणार? मंत्र्यांनी जे काम करायचे होते ते अजूनही केलेले नाही. या सर्व गोष्टी जेव्हा आमच्या कानावर आल्या तेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जात असून मंत्र्यांनाच शोधायची मोहीम सुरु करण्याची वेळ आली आहे, असे बोलून आज पुन्हा एकदा जारकीहोळींनी मंत्रांमार्फत सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोनावरील उपचाराचा हिशोब मागितल्यानंतर सरकार पाय मागे ओढत आहे. याविषयी अधिवेशनात चर्चा करण्यात येईल, शिवाय कोविड उपचारासाठी चार हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु याचा ताळमेळ कुठेतरी चुकल्यासारखा वाटतो. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेडची कमतरता असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
खाजगी रुग्णालयावर आता अवलंबून राहण्याची गरज नसून, आपल्याकडे अनेक वसतिगृहे आहेत, ज्याचा वापर आपण कोविड केअर सेंटर म्हणून करू शकतो. हुबळीमध्ये असेच कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून बेळगावमधील रुग्णांची होणारी गर्दीही काही प्रमाणात आता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये मृत्यूची संख्याही वाढली आहे. परंतु हे सर्व मृत्यू केवळ कोविड मुळेच झाले नसून इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचेही झाले आहेत, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.