अलतगा येथील गायरान जमिनीतील माती बेकायदेशीररीत्या खणून नेण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे निसर्गरम्य अशा उंच टेकड्यांना धोका निर्माण झाला आहे. काही मोठ्या कंत्राटदारांनी डोंगराळ परिसरातील माती खणून नेऊन रस्ता आणि इमारतींसाठी उपयोगात आणण्यात येत आहे. हे तातडीने थांबणे गरजेचे आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत आणि पर्यटन विभागणारे या प्रकाराकडे लक्ष देऊन मातीची तस्करी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अलतगा गावची 40 एकरहून अधिक गायरान जमीन आहे. हि जमीन हाडमोरूम असून याचा उपयोग कंत्राटदार आपल्या कामासांसाठी करत असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल चार ते पाच कंत्रादारांनी येथील माती खणून तस्करी करण्यास सुरुवात केली आहे.
या गायरान जमिनीमध्ये कडोली, जाफरवाडी, अलतगा, आंबेवाडी आदी गावातील नागरिक आपली जनावरे चारण्यासाठी येथे सोडत असतात. या परिसरातील मातीची तस्करी करण्यात येत असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
परिणामी गायरान जमिनीमध्ये काही भाग डोंगराळ असून येथे सुरु असलेल्या खाणकामामुळे निसर्गाला धोका पोहोचत आहे. त्याचप्रमाणे पशुपालन करणाऱ्यांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या मातीची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.