कोरोनाच्या थैमानामुळे रोगापेक्षाही जास्त धास्ती त्याच्या संसर्गाची वाटत आहे. आणि त्याहूनही जास्त धास्ती प्रशासकीय यंत्रणेची वाटत आहे. दिवसेंदिवस अनेक नकारात्मक गोष्टी कोरोनासाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणेकडून पुढे येत आहेत. कधी उपचाराबाबतीत दुर्लक्ष, तर कधी उपचाराला नकार तर कधी आणखी काय! दिवसेंदिवस या कारनाम्यांची मालिका सुरुच असून आज स्मशानभूमीतील नवीन बाब समोर आली आहे.
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या सदाशिव नगर स्मशानभूमीची निवड करण्यात आली आहे. या स्मशानभूमीत या मृतांसाठी रचण्यात आलेल्या सरणावर चक्क मृतदेहांना फेकून देण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला असून सध्या सोशिअल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कोरोनामुळे माणुसकीचा विसर पडत असून अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येत आहे.यासोबतच दुसरी बाजू पाहताना कोरोना रुग्णांवर उपचार करणे असो किंवा याची दखल घेणे असो.. प्रत्येकवेळी जनसामान्यांकडून प्रशासनाला कारणीभूत ठरवले जात आहे. परंतु प्रशासनामध्ये कार्यरत असणारीही माणसेच आहेत हे देखील विसरता काम नये.
प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा असते. कोरोनाची धास्ती जशी सर्वसामान्य माणसाला लागली आहे, तशीच धास्ती कोरोना वॉरियर्स म्हणून कार्य करणाऱ्यांनाही लागली असेल, यात तिळमात्र शंका नाही.
यामुळे प्रत्येकाने माणुसकीची भावना स्वतःमध्ये जिवंत ठेवल्यास एकदिवस आपण सर्वजण नक्कीच कोरोनावर मत करू. नियम, अटी, शिस्त आणि सय्यम या गोष्टी प्रत्येकाने आत्मसात केल्यास कोरोनावर मत करणे नक्कीच शक्य होईल, याची काळजी प्रत्येकाने आता घ्यायला हवी.