Thursday, December 19, 2024

/

आता आत्महत्या रोखण्यासाठी “हेल्प फोर नीडी”चा पुढाकार

 belgaum

लॉकडाउनच्या काळात समाजातील विविध घटकांवर कमालीचा ताण येऊन आत्महत्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाढत्या आत्महत्या ही चिंताजनक बाब असून त्या रोखण्यासाठी “हेल्प फोर नीडी” या संघटनेने विशेष असा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत चार ते पाच आत्महत्या रोखण्यामध्ये सदर संघटना यशस्वी झाली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी दिली.

शहरातील जत्तीमठ येथे आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हेल्प फोर नीडी ही संघटना समाजातील वंचित गरजू आणि गरीब घटकांसाठी कार्य करते. गेल्या तीन वर्षापासून सदर संघटना सिव्हिल हॉस्पिटलमधील गरजूंना विनामूल्य भोजन देत आहे.

याशिवाय ज्यांचे शिक्षण अडले आहे, ज्यांच्या शस्त्रक्रिया आर्थिक परिस्थितीमुळे थांबल्या आहेत, अशा सर्वांना सदर संघटना मदत करत असते. सध्याच्या काळात वाढलेल्या आत्महत्या लक्षात घेत सदर संघटनेने याबाबत कृतिशील पाऊल उचलले आणि या आत्महत्या रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती अनगोळकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, लॉकडाउनच्या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. माध्यमांमध्ये सतत आत्महत्येच्या बातम्या येत असतात. त्यामुळे आपण आत्महत्या करणाऱ्यांबाबत अस्वस्थ झालो आणि त्यासाठी हा उपक्रम हाती घेतला.

फेसबुक सारख्या समाज माध्यमावर त्याची माहिती दिली याचा निश्चितच समाजाला उपयोग झाला आणि किमान चार ते पाच कुटुंबांना संघटनेने मदत केली, असेही त्यांनी सांगितले. लॉक डाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरही विलक्षण ताण आला एसएसएलसी परीक्षेला न बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. त्याच्या कुटुंबियांनी आपल्याशी संपर्क साधला. सदर संघटनेने डॉक्टर आणि समुपदेशकांसमवेत घरी जाऊन त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन केले. महाराष्ट्रातून बेळगावात आलेल्या आणि येथील जीवनशैलीला कंटाळलेल्या एका व्यक्तीला आम्ही आत्महत्येपासून परावृत्त केले, अशी आत्महत्या रोखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या यशस्वी प्रयोगांची सुरेंद्र अनगोळकर यांनी माहिती दिली.

Help for needy press
Help for needy press

यावेळी विद्यार्थ्यांची मानसिकता त्यांच्या मनात येणारे विचार, त्यांच्यावरील ताण, पालक आणि मुलांच्या मधील समन्वय अशा सर्व मुद्द्यांवर प्रेरक वक्ता प्रीती बसवराज यांनी विवेचन केले. संघटनेच्या वैद्यकीय सल्लागार डॉ सविता कद्दू यांनी महिलांच्या समस्या आणि त्यांच्या आत्महत्येची कारणे याबद्दल माहिती दिली.

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे वागणे अचानक बदलते ती एकटी एकटी राहू इच्छिते, अचानक संवाद बंद करते किंवा अशा व्यक्तींच्या नेहमीच्या वागण्यामध्ये कांही बदल आढळले तर कुटुंबीयांनी त्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवावे आणि आपल्याला 8618993767 या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस योगेश कलघटगी, विश्वजीत हसबे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.