बेळगाव शहरात गुड्स शेड रोड येथील 72 वर्षीय वृद्धाच्या स्वरूपात बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर गुरुवारी गुड्स शेड रोड सेकंड क्रॉस परिसर सील डाऊन करण्यात आला आहे.
बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील कोरोनाच्या या पहिल्या बळीमुळे एकच खळबळ उडाली. मयत 72 वर्षीय वृद्ध हा गुड्स शेड रोड सेकंड क्रॉस येथील रहिवासी होता. त्याच्या मृत्यूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी हा परिसर सील डाऊन करण्यात आला. त्याचप्रमाणे मयत वृद्धाच्या थेट संपर्कातील नऊ जण व खाजगी इस्पितळात उपचार करणारे नऊ जण अशा एकूण 09 जणांना काॅरंटाईन करण्यात आले आहे.
गुड्स शेड रोड सेकंड क्लास येथील संबंधित वृद्ध दिनांक 12 ते 17 जून या कालावधीत बंगलोरला गेला होता. बेंगलोरहून परत बेळगावला आल्यानंतर हा वृद्ध घरीच होता. गेल्या आठवड्यात ताप आल्याने त्याला दोन वेळा खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुसर्या वेळेला श्वसनाचा तीव्र त्रास होऊ लागल्याने त्याला 30 जून रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचाराचा फायदा न होता काल बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर केवळ एक दीड तासात त्याचा स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. गुड्स शेड रोड येथील वृद्धाच्या मृत्यूमुळे आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 वर पोहोचली आहे.