पूर्ण जगासह, भारतातही आणि सध्या बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोना गल्लोगल्लीत व्यापला आहे. एक जरी रुग्ण आढळला तरी तेथील संपूर्ण भाग सीलडाऊन करण्यात येत आहे. आणि अशा सीलडाऊन केलेल्या भागाला पाहून जनतेची चिंता अधिकच वाढत आहे.
आज भाग्यनगरच्या आठव्या क्रॉस येथे कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने हा भाग सील डाऊन करण्यात आला आणि येथे बॅरिकेडस लावण्यात आले. या बॅरिकेडसवर आज एक मानवतेचा संदेश देणारा फलक लावण्यात आला होता. या फलकावर “THIS TOO SHALL PASS… GET WELL SOON..” असा फलक लावण्यात आला आहे.
इतक्या दिवसात पहिल्यांदाच असा फलक पाहायला मिळाल्याने फलक लावणाऱ्यांचे कौतुक करण्यात येत होते.
कोरोनावर अजून तरी कोणतेही औषध उपलब्ध झाले नाही. वैद्यकीय यंत्रणा कोरोना संक्रमितांवर उपचार करण्यात मग्न आहेत. अशावेळी मानसिकरीत्या कोरोनाबाधितांना समाधान मिळावे आणि या एका संदेशातून त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, ही वेळही निघून जाईल.. असा सकारात्मक संदेश या फलकाद्वारे देण्यात आला आहे.
कोरोनाने असा कोणताही परिसर सोडला नाही, जिथे याचा प्रसार झाला नाही. आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एखाद्या तरी भागात बॅरीकेडस दिसून येतात. प्रत्येक जण ज्या चिंतेच्या वातावरणात जगत आहे, यातून थोडासा दिलासा म्हणून अशा परिसरात असे फलक लावून माणुसकीचे दर्शन घडत आहे.
कोरोनाने ज्याप्रकारे आपले हातपाय पसरले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता घाबरून गेली आहे. जोपर्यंत यावर ठोस इलाज आणि लस मिळत नाही, तोवर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मास्क, सॅनिटायझरचा वापर करून तसेच सामाजिक अंतर राखण्याचे भान जपून आपणच ही कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, आणि या संकटातून बाहेर येण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, हाच सध्या मार्ग आपण अवलंबू शकतो.