सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळींची भेट घेऊन निवेदन सादर केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणात उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे या उत्सवाशी निगडित असलेल्या कामगारांना आर्थिक संकटाना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
या कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी याआधी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. याचा पाठपुरावा करण्यासाठी आज पुन्हा एकदा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. आणि या कामगारांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवाहन केले.
तसेच गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबतही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आधीच एक बैठक घेतली असून बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस शिवराज पाटील, स्वागताध्यक्ष प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्यासह कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.