बीम्स – सिव्हील हॉस्पिटलवर काल रात्री दगडफेक करण्याबरोबरच ॲम्बुलन्सला आग लावून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. यापैकी दोघांना काल रात्री तर इतरांना त्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे.
बीम्स हॉस्पिटलवर दगडफेक करून एका ॲम्बुलन्सला आग लावण्याचा हिंसाचाराचा प्रकार बुधवारी रात्री घडला. घी गल्लीतील एका 55 वर्षीय इसमाचा काल बुधवारी रात्री बीम्स – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच हॉस्पिटल आवारात दाखल झालेल्या मृताच्या नातेवाईकांसह जमलेल्या जमावाने हॉस्पिटलवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी अथणीहून आलेली एक ऍम्ब्युलन्स कोविड वाॅर्डसमोर उभी होती. संतप्त जमावाने ती ॲम्बुलन्स पेटवून देण्याबरोबरच आवारातील अन्य कांही कार गाड्यांचेही नुकसान केले.
या हिंसाचारामुळे काल रात्री बीम्स हॉस्पिटल परिसरात कांही काळ भीतीयुक्त तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाने अचानक हल्ला केल्यामुळे मी घाबरून लपण्यासाठी जागा शोधू लागले. जेंव्हा मी स्वच्छतागृहात लपण्याचा प्रयत्न केला.
तेंव्हा त्या स्वच्छतागृहात माझ्या आधीच इतर कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मला लपण्यास जागाच शिल्लक नव्हती, असे एका परिचारिकेने हिंसाचाराच्या घटनेनंतर बोलताना सांगितले. तेंव्हाही तिच्या डोळ्यातील भीती कमी झालेली दिसत नव्हती. दरम्यान, बीम्स हिंसाचार प्रकरणी एपीएमसी पोलीसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.