कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन सराफी, लोखंड, स्टील व सिमेंट असोसिएशनप्रमाणे इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, बापट गल्ली बेळगावने आपल्या कार्यक्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक दुकाने दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर परिसर आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चौक रस्त्याचा आणि बापट गल्लीचा कांही भाग सील डाऊन करण्यात आला आहे. तथापि 22 जुलै रोजी गणेशोत्सव आहे. तेंव्हा गणेशोत्सवादरम्यान चांगला व्यवसाय व्हावा आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, बापट गल्ली बेळगाव या संघटनेने दररोज सायंकाळी 6 वाजता इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेसह इलेक्ट्रॉनिक उद्योगाशी संबंधित ग्राहक, मालक आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तेंव्हा संबंधित दुकानदारांसह नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.