सध्याची प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात घरपट्टी वाढ केली जाऊ नये या मागणी संदर्भात येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी दिले आहे. तसेच घरपट्टी भरण्याची मुदतही वाढवून दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या निमंत्रणानुसार माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी संघटनेने या आधी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन सध्याच्या काळात घरपट्टी वाढवली जाऊ नये आणि घरपट्टी भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी विनंती केली. माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेतल्यानंतर घरपट्टी वाढीसंदर्भात दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिले. त्याचप्रमाणे घरपट्टी भरण्याची मुदत देखील निश्चितपणे वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सदर बैठकीत माजी नगरसेवकांनी कोरोना प्रादुर्भावास संदर्भात जनतेच्या अडीअडचणी जिल्हाधिकार्यांसमोर मांडल्या. तसेच यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनाध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी केले. शिष्टमंडळामध्ये संघटनेचे चिटणीस दीपक वाघेला, मालोजी अष्टेकर, संजय प्रभू, शिवाजी सुंठकर, विजय मोरे आणि आप्पासाहेब पुजारी यांचा समावेश होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची देखील भेट घेतली. तसेच अन्यायकारक घरपट्टी वाढ मागे घेण्याची आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली. मंत्री सुरेश अंगडी यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन सोमवारी जिल्हापालक मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत घरपट्टीबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.