सामान्य रुग्णालाही योग्य उपचार न मिळणाऱ्या बीम्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड वॉर्ड बनविण्यात आले. पण जिथे सामान्य रुग्णांचीच इतकी परवड होते तिथे कोविड वर उपचार योग्य रीतीने झाले तरच नवल! त्यातच कोविड रुग्णांच्या शवांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे.
आधीच या ना त्या कारणाने प्रकाशझोतात आलेला बीम्सचा भोंगळ आणि अनागोंदी कारभार आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुग्णालय प्रशासनाबाबत भीतीसहित संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज बेळगावच्या कॅम्प येथील एका मृत महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल झाली असून संबंधित मृताच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे. गेल्या शनिवारी एका कॅम्प येथील ५७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. शवविच्छेदनानन्तर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्यासंबंधी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी मात्र नातेवाईकांच्या मनात विचारांचे वादळ घोंगाऊन आपण नेमके कोणावर अंत्यसंस्कार केले? याविषयी संभ्रम निर्माण झाला. याची पडताळणी केली असता रुग्णालयातून सुपूर्द करण्यात आलेला मृतदेह हा त्या महिलेचा नसून इतर कोणाचा तरी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले असून तात्काळ पोलिसात धाव घेतली आहे.
या सर्व प्रकारामुळे आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेला बीम्सचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाटयावर आला असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कोविड च्या उपचारांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी सकाळीच कोरोना वार्डात सीसी टीव्ही बसवून कारभार पारदर्शक करू अश्या सूचना दिल्या होत्या गलथान कारभार केल्यास कारवाईचा देखील इशारा दिला होता मात्र पालक मंत्र्यांच्या सूचना केलेल्या काही तासातच बीम्सचा अनागोंदी कारभार समोर आला आहे