स्मशानात मृताची रक्षा गोळा करतेवेळी चितेच्या राखेतच सोन्याचे दागिने मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या हिंडलगा येथील एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सोमवारी अखेर पडदा पडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हिंडलगा येथील एका महिलेचा कोरोनामुळे दोन दिवसापूर्वी जिल्हा इस्पितळात उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला. मयत महिलेच्या पोस्टमार्टम अर्थात शवचिकिस्तेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब असल्याची तक्रार नातलगांनी केली. त्यावेळी शवचिकिस्ता करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे त्या महिलेच्या अंगावरील दागिने सुपूर्द केले. तथापि मयताच्या नातलगांनी एवढेच दागिने नव्हते यापेक्षा जास्त दागिने होते असे सांगून दागिने लंपास केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकाराची प्रसारमाध्यमांना देखील कुणकुण लागली होती.
दरम्यान, मयत महिलेवर दोन दिवसापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आज सोमवारी सकाळी रक्षा विसर्जनासाठी नातलग सदाशिनगर स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या याठिकाणी रक्षा गोळा करताना राखेमध्ये मयत महिलेचे गायब असलेले उर्वरित सोन्याचे दागिने त्यांना सापडले. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याच्या तथाकथित प्रकरणावर पडदा पडला आहे.
हिंडलगा येथील संबंधित मयत महिलेच्या नातलगांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अप्रत्यक्ष चोरीचा आरोप केल्याबद्दल जागरूक नागरिकांसह सेवाभावी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सिव्हिल हॉस्पिटलच नाहीतर सर्वच कोविड हॉस्पिटलमधील शवचिकित्सा करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी हे कोरोना वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.
तेंव्हा अशा परिस्थितीत मयतांच्या नातलगांनी शहानिशा न करता उगाच त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचे नांव बदनाम करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.