जिल्ह्यातील प्रतिष्ठेची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात डीसीसी बँकेची निवडणूक राज्य शासनाच्या आदेशावरून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावाचे निमित्त पुढे करून बेळगाव डीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात होणारी ही निवडणूक आता डिसेंबर महिन्यात होणार आहे. प्रतिष्ठेच्या डीसीसी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते इच्छुक होते. त्यामुळे राजकीय स्पर्धा निर्माण झाली होती. परिणामी या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता कोरोनाचे निमित्त पुढे करून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली असून राज्य शासनाने तसा आदेश जारी केला आहे.
बेळगाव आणि खानापूर तालुक्यात या निवडणुकीसाठी चुरस होती. सदर निवडणुकीद्वारे बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका सदस्याची डीसीसी बँकेवर निवड केली जाते. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्य बँकेच्या अध्यक्षाची निवड करतात. त्यामुळे या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
बेळगाव तालुक्यात जवळपास 80 ते 85 कृषी पत्तीन संस्था आहेत. या संस्थांना डीसीसी बँक निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार आहे. यापैकी जवळपास 45 संस्था या मराठी भाषिकांच्या ताब्यात आहेत. तथापि दुर्दैवाने आजतागायत डीसीसी बँकेवर मराठी उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे यावेळी मराठी भाषिक उमेदवार निवडणूक रिंगणात असावा अशी मागणी वाढत होती. त्या अनुषंगाने चाचपणी देखील सुरू झाली होती. मात्र आता सदर निवडणूकच डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.