बेळगाव तालुक्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसून येत असून आज बुधवारी यळेबैल येथील एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
यळेबैल (ता. बेळगांव) गांवातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 52 व 54 वर्षीय दोन महिला आणि 26 व 52 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. यळेबैलप्रमाणे तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथील 3 युवकांना आणि कंग्राळी खुर्द येथील एका 25 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.
याखेरीज जमनापुर येथील 75 वर्षीय वृद्ध पुरुष, गणेशपूर येथील 54 वर्षीय पुरुष, काकती येथील 61 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय युवक, नंदिहल्ली गावातील 60 वर्षीय पुरुष यांच्यासह राकस्कोप येथील 65 वर्षीय वृद्ध महिला आणि मुतगा येथील 52 वर्षीय महिला हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पद्धतीने बुधवारी सकाळपर्यंत तालुक्यातील एकूण 15 जण कोरोनाग्रस्त झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे हे रुग्ण सापडलेला परिसर डाऊन करण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगांव तालुक्यातील रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट होत आहे. याची आरोग्य खात्याच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आशा कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक गावच्या ग्रामस्थांनी गंभीर दखल घ्यावी. कोरोनाचा संसर्ग असताना देखील त्याची गंभीर दखल न घेता अनेक जण आरोग्याच्या तक्रारी असतानाही उपचार घेणे टाळत आहेत.
त्यामुळे अनेकांना मृत्युला कवटाळण्याची वेळ येत आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे. स्थानिक डॉक्टरांनीही अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती तात्काळ सरकारी डॉक्टरांना किंवा आशा कार्यकर्त्यांना दिली पाहिजे. कोरोनाला घाबरून न जाता योग्य वेळी उपचार घेऊन सुरक्षित होण्याची आवश्यकता असून यासाठी सामाजिक संघटना व युवक मंडळांनी जागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.