बीम्स हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर आता हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील स्पेशल कोव्हीड सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.
वंटमुरीनजीकच्या हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेमध्ये कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी 80 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मोरारजी देसाई शाळेतील व्यवस्था पाहण्यासाठी जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आज गुरुवारी हलभावीला भेट दिली.
कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या असिम्टोमेटीक व्यक्तींना येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. ज्यांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या कांही मोजक्या रुग्णांना हलभावी येथील मोरारजी देसाई शाळेत हलविण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात दाखल करायचे की मोरारजी देसाई शाळेत दाखल करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हलभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार मोरारजी देसाई शाळेत दाखल करण्यात येणाऱ्यांना भोजन, राहण्याची व्यवस्था,गरम पाणी आदी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनीही मोरारजी देसाई निवासी शाळेला भेट देवून पाहणी केली.