कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून अगदी प्रारंभीच्या गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात एकूण 18 रुग्ण आढळलेल्या बेळगाव जिल्ह्यात आता गेल्या फक्त आठ दिवसात तब्बल 188 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यावरून कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचे सिद्ध होत असल्यामुळे नागरिकांनी पूर्वीपेक्षा अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या चार महिन्यातील बेळगाव जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आलेख पाहता जून महिन्यापासून खऱ्या अर्थाने कोरोना विषाणूने जिल्ह्यात झपाट्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. गेल्या मार्च महिन्यांमध्ये कोरोनाने बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केला. जेंव्हा हिरेबागेवाडी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तेंव्हापासून 1 ते 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 झाली होती. पुढील पंधरा दिवसात ती 60 पोचली, तोपर्यंत 10 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता, तर एकाचा मृत्यू झाला होता. शिवाय जिल्ह्यातील ॲक्टिव्ह केसेस 58 होते. त्यानंतरच्या पंधरा दिवसात रुग्णांची संख्या वाढून जिल्ह्याने पहिल्यांदा रुग्ण संख्येचे शतक पार केले. या काळात एकदम 56 रुग्ण आढळून आल्यामुळे 31 मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 116 झाली होती. तसेच जिल्ह्यातील 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता तर ॲक्टिव्ह केसेस 50 होते.
मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 मे रोजी बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 161 होती आणि ॲक्टिव्ह रुग्ण 50 होते. त्याचप्रमाणे 110 जणांना कोरोना मुक्त झाल्यामुळे हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. या काळात मृत्यूची संख्या मात्र एकवरच स्थिर होती.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्यास खऱ्या अर्थाने जून महिन्यामध्ये प्रारंभ झाला. या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात विविध ठिकाणी अचानक तब्बल 205 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 300 चा आकडा ओलांडला. जिल्ह्यात 15 जून रोजी एकूण 306 कोरोनाबाधित रुग्णांसह 58 ॲक्टिव्ह केसेस होते. या काळात कोरोना मुक्त होणाऱ्यांची अर्थात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या मात्र 247 इतकी वाढली होती. सुदैवाने मृत्यूचा आकडा मात्र वाढला नव्हता. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यात नव्याने 24 रुग्ण आढळून आले आणि आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. थोडक्यात 30 जून रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 330 झाली होती आणि दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच ॲक्टिव्ह रुग्ण 22 होते आणि 306 सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
सध्या जुलै महिन्याच्या प्रारंभापासून मात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची तीव्रता चिंताजनक पद्धतीने वाढली आहे. गेल्या गेल्या 1 ते 7 जुलै या आठवड्याभराच्या कालावधीत विविध ठिकाणी नव्याने 188 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे 7 जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 416 झाली होती आणि ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊन ते 93 झाले होते. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाण देखील वाढवून या पंधरा दिवसात आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. या काळात 316 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर गेल्या बुधवार दि.15 जुलैपर्यंत जिल्ह्यात नव्याने 208 रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 604 झाली होती. त्याचप्रमाणे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढून 224 इतकी झाली. या काळात 366 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी मृतांची संख्या मात्र दुप्पट झाली. जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता 15 जुलैपर्यंत ही संख्या 14 झाली होती.
ही एकंदर आकडेवारी पाहता बेळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची तीव्रता निश्चितपणे वाढल्याचे दिसून येते. कोरोनाचा धोका आता अधिकच वाढल्यामुळे नागरिकांनी पूर्वीपेक्षा जास्त सतर्क राहून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करणे काळाची गरज बनले आहे.