रायबाग येथून बदली करण्यात आलेले तहसीलदार चंद्रकांत बजंत्री आणि भाजप आमदार दुर्योधन एहोळे यांच्यातील शीतयुद्ध विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सदर तहसीलदार आमदारांच्या हातचे बाहुले बनण्यास तयार नसल्याने त्यांचा राजकीय बळी देण्यात आला आहे.
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, कंकणवाडी गांवातील जमीन वादातून आमदार आणि तहसीलदार यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार एहोळे यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून तहसीलदार बजंत्री यांची तात्काळ बदली करण्याची विनंती केली होती.
आमदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी बदलीचा आदेश काढला असला तरी तहसीलदार बजंत्री यांच्या मते हा बदली आदेश नियमाला धरुन नाही. यासाठी त्यांनी कर्नाटक प्रशासकीय लवादासमोर या आदेशाला आव्हान दिले आहे. तसेच लवादाचा निर्णय लागेपर्यंत बदलीच्या ठिकाणी न जाता आहे त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या आहे त्या ठिकाणाहून आपल्याला हटवण्यासाठी आमदार आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी केला आहे. दरम्यान, कर्नाटक प्रशासकीय लवादाने आपला निर्णय जाहीर केल्यास या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.