बेळगाव शहरातील शेतकऱ्यांना ताबडतोब युरिया खताचा पुरवठा करावा, तसेच गतवर्षी अतिवृष्टीमुळे पडलेल्या शेतकऱ्यांच्या घरांना नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी शहर भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. युरिया खताचा तात्काळ पुरवठा न झाल्यास धरणे सत्याग्रहाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी बेळगाव शहर शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव शहरात बहुसंख्य शेतकरी असल्याने अलीकडेच भात पेरणी व लावणीला सुरुवात झाली आहे. आता पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची अत्यंत गरज आहे. परंतु शहरातील शेतकऱ्यांना युरिया मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे हे शेतकरी ग्रामीण भागातून चढ्या दराने युरिया खरेदी करून पिकाला देत आहेत. सध्या पिकाला युरियाची गरज असताना ते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. तेंव्हा वडगांव, शहापूर, अनगोळ, जुने बेळगाव आदी भागातील शेतकऱ्यांना माफक दरात तात्काळ यूरिया खताचा पुरवठा केला जावा.
त्याप्रमाणे गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शहरी भागातील बऱ्याच गरीब शेतकऱ्यांची घरे कोसळली आहेत. या कोसळलेल्या घरांचा संबंधित तलाठी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंचनामाही केला आहे. मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई ताबडतोब मंजूर करून अदा केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना एका शेतकरी नेत्याने सध्या या भात पेरणी आणि लावणीचा हंगाम सुरू आहे. आता पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची गरज असताना शहरातील शेतकऱ्यांना ते मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन अव्वाच्या सव्वा दराने युरियाची खरेदी करावी लागत आहे. शहरातील शेतकरी सध्या 269 रुपयांच्या युरियासाठी 400 रुपये मोजताहेत.
तेंव्हा शहरातील शेतकऱ्यांना तात्काळ युरिया खताचा पुरवठा केला जावा अन्यथा रयत संघ आणि हसिरू सेनेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने धरणे सत्याग्रह करावा लागेल असे सांगितले. आज निवेदन सादर करतेवेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत बाळेकुंद्री, जिल्हाध्यक्ष राजू मरवे, सेक्रेटरी भिमेश बिर्जे आदींसह अन्य पदाधिकारी व शहरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.