बेळगाव शहरातील आरएसएस कॉलेज जवळील देशपांडे चाळीच्या परिसरात गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या कामकाजादरम्यान येथील रहिवासी बाबू शामराव हणमशेट यांच्या घरच्या मागील बाजूच्या भिंतीचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या ८ दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता हे कामकाज हाती घेण्यात आले होते. तत्पूर्वी १५ दिवसांमागे या रस्त्यावर मोजमापही करण्यात आले होते. परंतु अचानकपणे कामकाजाला सुरुवात करून बाबू हणमशेट यांच्या घरच्या मागील बाजूच्या भिंतीचे नुकसान करण्यात आले आहे.
यासंदर्भात हणमशेट यांनी संबंधित कामगारांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. दरम्यान या कामकाजाचे संबंधित कंत्राटदार ईश्वर यांच्याशी हणमशेट यांनी संपर्क साधला. २ दिवसानंतर याची पाहणी करण्याचे आश्वासन संबंधित कंत्राटदाराकडून दिले गेले.
परंतु त्यानंतर आज पुन्हा कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतीत बाबू हणमशेट झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी केली आहे. परंतु भिंतीच्या नुकसानीबद्दल विचारणा केली असता ही भिंत जुनी असल्याचे कारण कामगारांकडून पुढे केले जात आहे.