सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सीमाभागात सुरू करण्याच्या निर्णयानुसार शिनोळी (ता. चंदगड) येथे कौशल्य अभ्यासक्रम आधारित महाविद्यालय सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथे आज रविवारी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिनोळी -चंदगड येथे कौशल्य अभ्यासक्रम आधारित महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील दोन जागांची पाहणी करून तेथे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत स्पष्ट केले. यासंदर्भात बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी शिनोळी येथे नियोजित महाविद्यालयासाठी 10 एकर जागा उपलब्ध आहे.
त्या जागेसह अन्य एका जागेची पाहणी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. महसूल प्रशासन आणि विद्यापीठ समिती यांच्याशी बोलणी झाली असून या दोन्ही जागांपैकी एका जागेवर या शैक्षणिक वर्षापासून शासकीय महाविद्यालय सुरू करून पारंपरिक अभ्यास क्रमांक परीक्षा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.
या निर्णयामुळे गडिंग्लज उपविभागातसह ग्रामीण डोंगराळ भाग, कोंकण -गोवा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चांगली सोय होणार आहे. त्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आजच्या कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी मंत्री सामंत यांनी खासदार संजय मंडलिक व सुरेश कुऱ्हाडे यांना आश्वासित करीत विद्यापीठ प्रशासनाला तातडीने शिनोळी -चंदगड येथे शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने, चंदगडचे आमदार राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, ॲड. सुरेश कुराडे आदी उपस्थित होते. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिनोळी येथे शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.