गेल्या शुक्रवारी असहाय्य तीव्र पोटदुखीमुळे एका वयस्क इसमाचा मृत्यू झाल्यानंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या बीम्स हॉस्पिटलमध्ये आज शनिवारी कागवाड येथील एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
मधुमेह रुग्ण असलेल्या सदर महिलेला या गंभीर अवस्थेत बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये डॉक्टरांनी तिच्यावर मधुमेहासाठी आवश्यक उपचारच केले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दोस्तीकोप यांनी याप्रकरणी डॉक्टरांकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. त्या 30 वर्षीय महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती. तिला ऑक्सीजनही दिला होता. परंतु तिचे प्राण वाचू शकले नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून यामध्ये एका राजस्थानी इसमाला तो कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राजस्थानचा एक इसम बेंगलोरहून 10 जूनला बेळगावला आला होता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येण्यापूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
माझ्या घरी 14 जुलैला एक ऍम्ब्युलन्स आली आणि मला हॉस्पिटलमध्ये आणून दाखल करण्यात आले. तेथील नर्सने सांगितले की माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र तीन दिवसानंतर त्याच नर्सने जरा चूक झाली आहे, तुमचा अहवाल पॉझिटिव्ह नव्हे तर निगेटिव्ह आला आहे, असे सांगितल्याची माहिती त्या राजस्थानी इसमाने दिली आहे.