रुग्णाच्या मृत्यूनंतर बीम्स / सिव्हिल हॉस्पिटलवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड व जाळपोळ केल्याप्रकरणी आज शनिवारी आणखी एकाला पोलिसांनी अटक केल्यामुळे गजाआड झालेल्यांची एकूण संख्या 15 झाली आहे.
उजेर खालिद मनियार (वय 18, रा. उज्वलनगर पाचवा क्रॉस, बेळगांव) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे.
उजेर हा आयटीआय विद्यार्थी आहे. गेल्या बुधवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील कोवीड -19 वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांसह उपस्थित जमावाने हॉस्पिटलवर तुफान दगडफेक करीत आवारातील वाहनांचे नुकसान करण्याबरोबरच एक रुग्णवाहिका पेटवून दिली होती.
त्यावेळी वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करून केवळ 12 तासात 14 जणांना अटक केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी वरीलप्रमाणे आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.