बेळगाव शहरात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे. बेळगाव येथे सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे हे स्टेडियम राज्यातील तिसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम असणार आहे. यामुळे बेळगावच्या हॉकी क्षेत्राला पुन्हा सोनेरी दिवस येणार आहेत.
बेळगाव शहरात आता क्रिकेट मागोमाग हॉकी या खेळाला देखील चांगले दिवस येण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. कारणच लवकरच शहरातील ऑटोनगर येथील केएससीए स्टेडियम शेजारी रामतीर्थनगर येथील 8 एकर जागेत 15 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक हॉकी स्टेडियमची उभारणी केली जाणार आहे. क्रिकेट या खेळाने अलीकडे दोन-तीन दशकांत बेळगावला नावलौकिक मिळवून दिला असला तरी तत्पूर्वी बेळगाव हे “हॉकी” या खेळासाठी ओळखले जात होते. बेळगावने देशाला ऑलिम्पियन बंडू पाटील, शंकर – लक्ष्मण आदींसारखे दर्जेदार हॉकीपटू दिले आहेत.
ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू बेळगावची शान होते. या खेळाडूंमुळे एकेकाळी हॉकी क्षेत्रात बेळगावचा दबदबा होता. बेळगावसाठी तो एक सुवर्णकाळ होता. मात्र कालांतराने बेळगावातील हॉकी कला लोप पावत गेली. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी शहरातील जुनेजाणते हॉकीप्रेमी आणि खेळाडू आज देखील जुन्या काळातील हॉकीचा सुवर्णकाळामध्ये रमताना दिसतात. आता या सर्वांसाठी ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम म्हणजे एक खूश खबरच आहे.
सध्या या स्टेडियमसाठी ऑटोनगर येथील केएससीए स्टेडियम शेजारील रामतीर्थनगर येथील 8 एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. सदर अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर जॉगिंग पाथ, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेल्स देखील असणार आहेत.
बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेसाठी ही अत्यंत उत्साहवर्धक आणि आनंदाची बातमी आहे. जिल्हा हॉकी संघटनेचे धनंजय पटेल, गोपाळ खांडे, एम. जे. तेरणीकर, खालिक बेपारी, करीम बेपारी आदी जुन्या-जाणत्या अनुभवी वयस्क हॉकी खेळाडू, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1150931108597814&id=375504746140458