उत्तर प्रदेशातील अयोध्या या रामजन्मभूमीत येत्या बुधवार दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी ऐतिहासिक श्री राम मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा शुभमुहूर्त बेळगाव शहरातून गेला आहे. येथील एका पंडिताने हा शुभमुहूर्त काढून अयोध्या येथील राम मंदिर विश्वस्थ समितीला पाठविला आहे.
शहरातील रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज शेजारी जक्कीनहोंडनजीकच्या राघवेंद्र स्वामी नववृंदावन आश्रमाच्या विद्या विहार विद्यालयचे कुलपती पंडित एन. आर. विजयेंद्र शर्मा हे ते पंडित होत. शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठीचा येत्या 5 ऑगस्टचा शुभ मुहूर्त आपणच काढून दिला असल्याची माहिती “बेळगाव लाईव्ह”ला दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील श्रीराम जन्मभूमीमध्ये राम मंदिर व्हावे ही प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. या ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीचे काम सुरू करण्यासंदर्भात राम मंदिराचे विश्वस्त राष्ट्रसंत स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. तसेच राम मंदिर उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी एक शुभमुहूर्त काढून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण दि. 29 जुलै रोजी सकाळी 9 नंतर, दि. 31 जुलै रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत, दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 नंतर आणि दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण दिवसभर मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ करण्यासाठी शुभमुहूर्त असल्याचे कळविले होते. मी स्वतः तसे पत्र लिहून राम मंदिराच्या विश्वस्तांना गेल्या 15 जून रोजी पाठविले होते, असे पंडित विजयेंद्र यांनी सांगितले.
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरासाठी शुभमुहूर्त काढून दिल्याचा मला स्वाभिमान वाटण्यापेक्षा त्यासंदर्भात खूप संशोधन केले असल्यामुळे या मंदिर उभारणीमुळे जगाचे कल्याण होणार आहे याचेच मला समाधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे श्री पांडुरंग रखुमाई यांना स्मरून मी हा शुभमुहूर्त काढला आहे. कारण बुधवार हा पांडुरंगाचा वार आहे. श्री विठ्ठल हा जगाचा मालक आहे कमरेवर हात ठेवून श्री विठ्ठल रखुमाई आमच्या संरक्षणासाठी थांबले आहेत असेही पंडित शर्मा म्हणाले.
शहरातील रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज शेजारी जक्कीनहोंडबद्दल बोलताना हे एक ऐतिहासिक स्थान असल्याचे असल्याचे पंडितजींनी सांगितले याठिकाणी जानकीचे म्हणजेच सीता मातेचे राम-लक्ष्मण आणि हनुमान समवेत वास्तव्य होते, अशी माहिती त्यांनी दिली. आपण पूर्वी मुंबईला राहत होतो. त्यावेळी बेळगावच्या कलेक्टरांसह येथील अनेक मान्यवर व्यक्ती माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत होते. त्या मंडळींनी तुम्ही काशी विद्यापीठाचे सुवर्ण पदक विजेते पदव्युत्तर पदवीधर आहात तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही बेळगावला चला, अशी मला गळ घातली. त्यामुळेच मी बेळगावला आलो संबंधित मंडळींनीच मला जक्कीनहोंडा येथील ही जागा वास्तव्यासाठी देऊ केली, असे पंडित शर्मा यांनी स्पष्ट केले.
तसेच भारतात होऊन गेलेल्या ऋषी -मुनी, तीर्थंकरांसह लोकमान्य टिळकांसारखे ज्योतिष तज्ञ या सर्वांच्या कृपेमुळे मी श्री राम मंदिराचा मुहूर्त काढू शकलो. यापूर्वी दिवंगत रामभाऊ पोतदार यांच्यासमवेत माजी पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई, पी. व्ही. नरसिंहराव, राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, एपीजे अब्दुल कलाम, माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे वगैरे मातब्बर मंडळींसह अनेक नेते, वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी यांच्यासाठी आपण विविध कामांचे शुभमुहूर्त काढून दिले असल्याची माहिती पंडित एन. आर. विजयेंद्र यांनी शेवटी दिली. तसेच बेळगांव लाईव्हला आशीर्वाद देऊन सुयश चिंतले.
दरम्यान, अयोध्या येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरासाठी श्रीराम सेनेतर्फे कर्नाटकातील श्री हनुमान जन्मस्थानाच्या ठिकाणची एक शिळा नेण्यात येणार आहे. कर्नाटकातील होस्पेट (जि. बेळ्ळारी) तालुक्यातील हंपी नजीकच्या अंजनाद्री हे श्री हनुमान जन्मस्थान आहे. या ठिकाणची एक शिळा विधीवत पूजा करून रेल्वेमार्गाने अयोध्येला नेण्यात येईल. श्री हनुमान जन्मस्थानची शिळा श्रीराम जन्मस्थानाचा ठिकाणी घेऊन जाण्याची ही घटना देशातील एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. ही घटना आणि बेळगावातून काढून देण्यात आलेला शुभमुहूर्त या दोन्ही गोष्टी बेळगावसह आपल्या राज्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहेत.