गोवावेस अर्थात बसवेश्वर सर्कलकडून शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाचे काम गेल्या जवळपास महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे पादचाऱ्यांना विशेषता दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे.
गोवावेसकडून शहापूर कडे (डाक बंगलामार्गे) जाणाऱ्या सुमारे 150 मी. लांबीच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुमारे महिन्याभरापासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी कंत्राटदाराने डांबराचा नवा थर घालण्यासाठी सदर रस्त्यावरील सुमारे एक इंच जाडीचा जुन्या डांबराचा थर काढून टाकला आहे.
परंतु या पद्धतीने जुन्या डांबराचा थर काढून टाकल्यानंतर लागलीच नवा थर घालून काम पूर्ण करण्यात यायला हवे होते. तथापि जुना डांबराचा थर काढल्यानंतर या रस्त्यावर बारीक खडीचा थर पसरवून संबंधित कंत्राटदार गायब झाला आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खडी पसरविण्यात आली असल्यामुळे हा रस्ता सध्या दुचाकीस्वारांसाठी धोकादायक बनला आहे. कारण रस्त्यावरील खडीमुळे दुचाकी वाहने घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारांना आपली वाहने अत्यंत जपून हाकावी लागत आहेत.
त्याचप्रमाणे गेल्या दोन-तीन दिवसात पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या बस, ट्रक सारखे एखादे मोठे वाहन भरधाव वेगाने गेल्यास या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. सदर रस्त्या संदर्भात संबंधित खात्याशी संपर्क साधला असता कांही अपरिहार्य कारणास्तव बंद पडलेले या रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.