शेतकऱ्यांसाठी वडगांव कृषी पत्तीन संस्थेकडे युरिया खताचा साठा पाठवून देण्यात येणार आहे. तथापि या पत्तीन संस्थेच्या भाडोत्री इमारतीची गळती लागून दुरवस्था झाली आहे. तेंव्हा कृषी खात्याने खत ठेवण्यासाठी सदर इमारत तात्काळ दुरुस्त करावी अथवा तात्पुरती दुसरी जागा शोधून शहरी शेतकऱ्यांना ताबडतोब खतपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शहरी शेतकऱ्यांना सध्या युरिया खताचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने मूळ किमतीपेक्षा जास्त म्हणजे 350 ते 400 रु दराने इतर भागातून युरिया आणावे लागत आहे. यासाठी वरिष्ठ कृषी अधिकारी जिलानी मोकाशी यांच्याशी संपर्क साधून त्यांना शहरी शेतकऱ्यांना तात्काळ युरिया उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार मोकाशी यांनी आजच युरिया खत मागवून शहरात वितरित करण्याची ग्वाही दिली आहे. वडगांव कृषी पत्तिन सोसायटीकडे युरिया पाठवून देण्याची व्यवस्था करतो असेही त्यांनी सांगितले आहे.
तथापी वडगांव कृषी पत्तिन सोसायटी जिथे आहे, ती जागा महानगरपालिकेची आहे. मागच्यावेळी आपली ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनपाने केला होता. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना मदत व्हावी या उद्देशाने सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळाने न्यायालयात दावा दाखल करुन मनपाच्या कारवाईवर स्थगिती आणली आहे. वडगांव कृषी पत्तीन सोसायटीची इमारत लाल कौलारु असल्याने ही छताची कवले अनेक ठिकाणी फुटली आहेत. परिणामी पावसाळ्यात इमारतीत मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती लागत असल्यामुळे याठिकाणी युरिया खत ठेवता येत नाही.
यासाठी एकतर ती इमारत कृषी खात्याने दुरुस्त करून तिथे युरिया व इतर खतं ठेवण्यासाठी सोय केली पाहिजे अन्यथा तात्पुरती दुसरी जागा शोधून ताबडतोब शहरी शेतकऱ्यांना खत पुरवठा करावा अशी समस्त वडगांव, जूनेबेळगाव, शहापूर तसेच इतर भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा बेळगाव शहर रयत संघटना, कृषी पत्तिन सोसायटी वडगांवचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शेतकरी सभासद, इतर शेतकरी आंदोलन करून जिल्हाधिकारी व मुख्य कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या तयारित आहेत.