एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड.. यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप… यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही.
मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या हाहाकारामुळे प्रत्येकाला एका तणावपूर्ण वातावरणातून जावे लागत आहे. त्यात कोरोनावरील लस किंवा औषध अजूनही उपलब्ध झाले नसून वैद्यकीय सेवेची वानवा झाली आहे. उपचाराअंती कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील समाधानकारक असली तरीही अनेक रुग्ण उपचाराअभावी फरफटत आहेत. आणि उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.
घी गल्ली येथील एका 55 वषीय रहिवाशाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्स प्रशासनाने सर्जिकल ब्लॉकमधील क्वारंटाईनमध्ये त्याला ठेवले होते. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. या वॉर्डमध्ये हलविल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. अशातच रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी बीम्स परिसरात तुफान दगडफेक करीत रुग्णवाहिका पेटविली. वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला.
बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळ स्टाफने धरणे आंदोलन सुरू केले. बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळामधील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी यात सहभाग घेतला आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता नागरिक, प्रशासन, प्रशासकीय व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यात एकमेकात कोणताच ताळमेळ नसल्याचे जाणवते. या एकंदर परिस्थितीवरून एकवेळ कोरोना परवडला परंतु अशा घटनांमुळे होत असलेली घालमेल आणि ससेहोलपट नक्कीच महागात पडेल, हे नक्की.