स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांकडून झाडाच्या फांद्या तोडून नाल्यात टाकल्या जात आहेत याचा टिळकवाडी येथील मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी व एम. जी. कॉलनी परिसरातील नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. या हलगर्जीपणामुळे सध्या पावसाळ्याच्या दिवसात या भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नाल्यातील झाडाच्या फांद्या व पालापाचोळा त्वरित हटवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
उपरोक्त वसाहतीतील नागरिक स्वामी विवेकानंद वेल्फेअर असोसिएशनच्या (एसव्हीडब्ल्यूए) नेतृत्वाखाली कार्य करतात. झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा मराठा कॉलनी येथील नाल्यात टाकण्याच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामाला या संघटनेने तीव्र विरोध केला आहे. एसव्हीडब्ल्यूएचे सदस्य असणाऱ्या राहुल बाळेकुंद्री यांनी सांगितले की, मराठा कॉलनी आणि आसपासचा परिसर हा सखल भागात असल्यामुळे या गेल्या अनेक वर्षापासून ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत असते.
नानावाडी आणि टिळकवाडीतील पापाचा मळ्याच्या वरच्या बाजूने वाहत येणारे नाले तुंबल्यामुळे दरवर्षी मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी व एम. जी. कॉलनी परिसरातील नागरिकांना परिस्थितीला तोंड द्यावे लागत असते. विकास कामे राबवताना या भागात पावसाळ्यामध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यादृष्टीने काळजी घेतली गेली पाहिजे. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते असेही बाळेकुंद्री यांनी सांगितले.
गेल्या कांही दिवसांपासून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मराठा कॉलनी येथे विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु ही कामे करताना कामगारवर्ग कामात अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून त्या फांद्या आणि पालापाचोळा नजीकच्या नाल्यात फेकून देत आहेत.
या प्रकारामुळे मुसळधार पाऊस झाल्यास नाला तुंबून या भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नानावाडी येथून मराठा कॉलनी मार्गे वाहणाऱ्या या नाल्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत नाल्यात टाकण्यात आलेल्या झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा वेळीच हटवून नाला स्वच्छ न केल्यास जोरदार पावसामुळे निश्चितपणे मराठा कॉलनीमध्ये पूर येणार असल्याचेही स्थानिकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात स्मार्ट सिटी योजनेच्या संबंधित धिकार्यांशी संपर्क साधला असता कामगारवर्ग झाडाच्या फांद्या तोडून नाल्यामध्ये टाकत आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात पाहणी करून जर झाडांच्या फांद्या तोडून नाल्यामध्ये टाकण्यात आल्या असतील तर त्या तात्काळ तेथून काढल्या जातील आणि नाला स्वच्छ केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.