उडाण -3 योजनेमुळे बेळगाव विमानतळाचा कायापालट झाला असून येथील विमान सेवेमुळे बेळगाव देशातील 13 नव्या शहरांशी जोडले गेले आहे. सध्या या विमानतळाकडे 320 एअरबस सारखी मोठी विमाने उतरू शकतील इतकी क्षमता आहे, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
सीआयआय बेळगावतर्फे आयोजित “न्यू एज कनेक्टिव्हिटी अँड लॉजिस्टिक्स” या विषयावरील डिजिटल कॉन्फरन्सप्रसंगी महत्त्वाकांक्षी उडाण योजनेचा छोट्या व मध्यम शहरांमधील विमानतळांवर झालेला परिणाम आणि त्यांच्यात कशा पद्धतीने आधुनिक परिवर्तन घडत आहे, यासंदर्भात बोलताना मौर्य यांनी उपरोक्त माहिती दिली. राजेशकुमार मौर्य पुढे म्हणाले की, पंतप्रधानांसह संबंधित मंत्री आणि मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली उडाण योजना 2016 मध्ये कार्यान्वित झाली. उडान म्हणजे संपूर्ण देशातील सर्वसामान्य नागरिक (पुरे देश का आम आदमी) होय. एखाद्या छोट्या गावातील अत्यंत छोट्या गल्लीतील सर्वसामान्य नागरिकाला देखील विमान प्रवास करता यावा या मुख्य उद्देशाने उडाण योजना सुरू करण्यात आली होती. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी 2016 मध्ये प्रारंभी पहिल्या टप्प्यात उडाण योजनेअंतर्गत परिवर्तन घडवून आणण्यासाठी देशातील 56 विमानतळांची निवड केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 112 विमानतळांची निवड झाली. यामध्ये ते हुबळी विमानतळाचा अंतर्भाव होता. पुढे उडाणच्या तिसऱ्या टप्प्यात बेळगाव विमानतळाचा अंतर्भाव झाला. उडाण -3 योजनेमुळे दोन-तीन वर्षांपूर्वी अवघ्या 4-5 शहरांशी जोडले गेलेले बेळगाव आता देशातील 13 नव्या शहरांशी जोडले गेले आहे, असे मौर्य यांनी स्पष्ट केले.
बेळगाव विमानतळाकडे सर्व पायाभूत सुविधा आहेत. हे विमानतळ अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे की 320 एअर बस सारख्या मोठ्या विमानांसाठी देखील या विमानतळाचा वापर केला जाऊ शकतो. येथील धावपट्टी अर्थात रनवे 320 एअर बस सारख्या मोठ्या विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या लांबीचा आहे.
आमच्याकडे सर्व पायाभूत सुविधा असून देखील दुर्दैवाने दोन-तीन वर्षांपूर्वी विमान कंपन्या या ठिकाणी येण्यास तयार नव्हत्या. कदाचित खर्च आणि नफा हे त्याचे कारण असावे. परंतु आता उडाण -3 योजनेमुळे पांच विमान कंपन्यांच्या मदतीने बेळगावहून 13 मार्गांवर विमानसेवा सुरू आहे, असे मौर्य यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, गेल्या कांही वर्षापासून देशातील एव्हिएशन इंडस्ट्री अर्थात विमान वाहतूक उद्योग वाढत चालला आहे. देशात विमानतळे असणाऱ्या शहरांची टायर वन, टायर टू आणि टायर थ्री अशी विभागणी करण्यात आली आहे. टायर वन विभागात मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर आदी सर्वात मोठ्या विमानतळांचा समावेश असतो. याउलट टायर टू व टायर थ्री विभागात त्यातल्या त्यात मोठ्या, मध्यम आणि लहान विमानतळांचा समावेश असतो. भारतात एकूण 115 विमानतळे असून यापैकी 90 विमानतळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली आहेत. त्याचप्रमाणे 115 विमानतळांपैकी 20 आंतरराष्ट्रीय आणि 59 देशांतर्गत विमानतळे आहेत. त्याचप्रमाणे 11 विमानतळे राज्य सरकारांच्या मालकीची आहेत. गेल्या सहा-सात वर्षापूर्वी देशातील बहुतांश विमानतळांकडे इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात पायाभूत सुविधा असून देखील कनेक्टिव्हिटी नव्हती. परंतु केंद्र सरकारने आता यामध्ये परिवर्तन आणण्यास सुरुवात केली आहे. उडाण योजना कार्यान्वित झाल्यामुळे देशातील टायर टू आणि टायर थ्री शहरातील लहान व मध्यम विमानतळांची झपाट्याने प्रगती होत आहे, अशी माहितीही बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी डिजिटल कॉन्फरन्सप्रसंगी दिली.