कोविडचे वारे जसे भारतात सुरु झाले त्यादिवसापासून नागरिकांच्या सुरक्षेच्या सेवेसाठी आशा कार्यकर्त्या दिवसरात्र कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या कामाचा योग्य मोबदला तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याची तक्रार करत गेले १२ दिवस आशा कार्यकर्त्यांनी संप पुकारला होता. यासाठी विविध अधिकारी आणि मंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आली.
आज बेळगावच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांना निवेदन सादर केले.
या मागणीतील प्रमुख मागणी म्हणजे मानधनात वाढ करण्याची.. ६ हजारावरून १२ हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावे, कोरोनाच्या परिस्थितीत सुरक्षा उपकरणांच्या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह आशा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
३० जूनपासून आतापर्यंत अनेक निवेदने दिली आहेत तसेच १० जुलैपासून कामावर बहिष्कार घातला असून आम्हाला कोणीही योग्य प्रतिसाद दिला नाही. कोरोनासारख्या संकटकाळातही अत्यंत तुटपुंज्या पगारावर सेवा बजावली आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव सुरु झाल्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहोत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती त्यांनी जिल्हा पालकमंत्र्यांना केली आहे. हे निवेदन सादर करताना अनेक आशा कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.