बेळगाव शहरात शुक्रवारी एक 30 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले असून ही शहरातील पहिली “सारी” केस आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 311 झाली आहे.
नव्याने आढळून आली पी -10626 क्रमांकाची ही महिला श्रीनगर गार्डन परिसरातील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून समजते. सदर महिलांमध्ये कोरोना सारख्या श्वसन संसर्गासह उच्च तापाची लक्षणे आढळून आली आहेत. या पद्धतीची लक्षणे आढळून आलेली शहरातील ही पहिली रुग्ण आहे. गंभीर तीव्र श्वसन संसर्गाची (सारी) लक्षणे कोरोना संसर्ग प्रमाणेच असतात. डॉक्टरांच्या मते कर्नाटकातील बहुतांश “सारी” रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांचे सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत. सारी रुग्णांमध्ये न्युमोनियाप्रमाणे लक्षणे आढळतात. परिणामी त्यांच्यापासून संसर्गाचा धोका असल्याने त्यांच्यावर कोरोना रुग्णाप्रमाणे उपचार करावे लागतात. या पद्धतीचे रूग्ण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले तरच त्यांना कोव्हीड -19 वार्डमध्ये हलविण्यात येते.
दरम्यान, जिल्ह्यात आज शुक्रवारी पी -3140 क्रमांकाच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यात गेल्या 24 तासात नव्याने 445 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आज आणखी 10 जणांचा मृत्यू झाला असून अॅक्टिव्ह केसिस 3,905 इतक्या आहेत.
कोरोनासाठी आता बेळगावसह राज्यात व्यापक “रँडम टेस्टिंग”
कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने राज्यात यापुढे “व्यापक रँडम टेस्टिंग” (यादृच्छिक चांचणी) करण्याचा आदेश देणारे परिपत्रक जारी केले आहे. बेळगावात याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
शहरातील चव्हाट गल्ली येथे आज शुक्रवारी 50 नागरिकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. याप्रसंगी नागरिकांच्या संपूर्ण आरोग्य तपासणीसह शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. कर्नाटक आरोग्य खात्याने राज्यातील झोपडपट्टीवासीय, विक्रेते, बिल कलेक्टर्स आणि कुरियर व घरपोच खाद्य पोहोचविणारे कर्मचारी यांच्या रँडम कोरोना टेस्टची घोषणा बुधवारी केली होती. या गटांमधील 50 वर्षे वयावरील व्यक्ती आणि व्याधिग्रस्त व्यक्तींची प्राधान्याने कोरोना तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार शुल्क लागू करण्यासंदर्भातील प्रस्तावावर सरकार विचार करत असून या प्रस्तावावर कांही दिवसात निर्णय घेतला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे.