बेळगावचे स्मार्ट सिटी रूपांतर करण्यात येत असले तरी येथील उद्यमबाग वसाहतीकडे मात्र शासनाचे पार दुर्लक्ष झाल्याचे कालपासून सुरू झालेल्या मृगाच्या पावसाने दाखवून दिले आहे. पावसामुळे सध्या उद्यमबाग येथील रस्ते, आणि गटारींची पार दुर्दशा झाली असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे.
बेळगाव शहराला काल पावसाने झोडपल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीची तर पार वाट लागून गेली आहे. संततधार पावसाने या ठिकाणचे रस्ते चिखलमय झाले असून गटारी तुंबून तुडुंब भरून वाहत आहेत. या ठिकाणच्या बहुतांशी रस्त्यांचे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. याठिकाणी साधे चालत जाणेही महाकठीण झाले आहे. परिणामी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्या ठिकाणी मालाची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून दुचाकी चालविताना प्रत्येकाला जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
पावसामुळे या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जवळपास प्रत्येक वर्कशॉप समोरील रस्त्यावरून गटारांमध्ये तुंबलेले पावसाचे गढूळ पाणी वाहताना दिसत आहे. उद्यमबागमधील बऱ्याच या भागात गटार बांधकाम झालेले नाही त्यामुळे ही गटारे तुंबून तुडुंब भरून वाहत आहेत. कांही ठिकाणी छोट्या नदी सदृश्य पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे.
सरकारी तिजोरीत टॅक्स जमा व्हावा यासाठी उद्योजकांनी गुंतवणूक करावी लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी सरकारची अपेक्षा असते परंतु औद्योगिक वसाहतीची जर वरील प्रमाणे अवस्था असेल तर तेथील उद्योगधंद्यांचा उत्कर्ष तरी कसा होणार? त्यामुळे उद्योजक गुंतवणूक तरी कशी करु शकणार? असा सवाल केला जात आहे.
तरी बेळगाव महापालिकेसह स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्यमबाग येथील रस्ते आणि गटारींची निदान या पावसाळ्या पुरती तरी चांगली साफसफाई व दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.