टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो आवारात मोठमोठी झाडे एकीकडे भुईसपाट केली जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवली जात असल्याने पर्यावरणवाद्यांना “हसावे की रडावे” हे कळेनासे झाले आहे.
व्हॅक्सिन डेपोला बेळगाव शहराचे फुफ्फूस म्हंटले जाते. या ठिकाणी औषधी वनस्पती आणि झाडे तर आहेतच शिवाय विविध प्रकारच्या पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे हे जणू छोटेखानी अभयारण्यच आहे. मात्र आता व्हॅक्सिन डेपो वादाचा विषय बनले आहे. कारण डेपोच्या एका भागात वनखात्याकडून शेकडो औषधी वनस्पतींचे वनीकरण केले जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. एका कंत्राटदाराने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ही वृक्षतोड सुरू केल्याची माहिती मिळताच उप वनसंरक्षणाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, आरएफओ आर. एच. डोंबरगी, डेप्युटी आरएफओ विनय एस. गौडर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सदर वृक्षतोड तात्काळ थांबविली.
यासंदर्भात चौकशी केली असता स्मार्ट सिटी लिमिटेडने व्हॅक्सिन डेपोमधील संबंधित ठराविक झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला असून कोणत्याही क्षणी तशी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तथापि येथील वर्तुळाकार प्रेक्षागृह लवकरात लवकर उभारण्याचे असल्याने राजकीय दबावापोटी संबंधित कंत्राटदारांनी परवानगी पत्र हाती येण्यापूर्वीच वृक्षतोड सुरू केली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जेंव्हा यासंदर्भात चौकशी केली, तेंव्हा सदर वृक्षतोड बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासाठी त्यांनी त्या कंत्राटदाराला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
आरएफओ आर. एच. डोंबरगी यांनी तोडण्यात आलेली झाडे ही अकेशिया जातीची असल्याची माहिती दिली. हि झाडे वनीकरणास उपयुक्त नसल्याने ती तोडावी लागतात. परंतु सध्या विनापरवाना सुरू असलेली या वृक्षांची तोड सध्या थांबविण्यात आली आहे असे सांगितले.
व्हॅक्सिन डेपोमधील नैसर्गिक साधनसंपत्ती अबाधित राखण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी अडीच हजाराहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली असून यापैकी बहुतांश रोपे ही औषधी वनस्पतींची आहेत, अशी माहिती डेप्युटी आरएफओ विनय एस. गौडर यांनी दिली. त्याचप्रमाणे व्हॅक्सिन डेपो परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात लोक जात असतात. त्यांना आम्ही विनंती केली की, त्यांनी हि रोपे विभागून घेऊन प्रत्येकाने एका रोपाच्या संवर्धनाची जबाबदारी उचलावी आणि सर्वांनी ती मान्य केल्याचे गौडर यांनी सांगितले.
दरम्यान, एकीकडे वृक्षतोड सुरू असताना दुसरीकडे वृक्षारोपण करण्यामागील गणित अद्यापही पर्यावरणवाद्यांच्या लक्षात आलेले नाही. अकेशियाची झाडे आता नाहीतर नंतर परवानगी मिळताच तोडली जाणार आहेत. वनखात्याने देखील ही झाडे उपयुक्त नसल्याचे सांगितले आहे. तेंव्हा ही झाडे तोडण्याला आमचा आक्षेप नसेल मात्र संबंधित कंत्राटदाराने जर औषधी झाडांना आपले लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.