विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.विद्यार्थ्यांना कोणत्याही तऱ्हेचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बेळगावातील जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील दहावीच्या परिक्षेसंबंधी सुरेशकुमार यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या आणि हिताच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.यासाठी मुलांची सुरक्षितता आणि आत्मविश्वास याविषयी शिक्षकांनी जागरूक राहिले पाहिजे.
प्रत्येकाकडे स्मार्ट फोन किंवा नेटवर्क असू शकत नाही.यासाठी शिक्षकांनी घरोघरी जावून विद्यार्थ्यांना शिकवावे.खेडेगावात मोठ्या घरात किंवा इमारतीत सामाजिक अंतर पाळून विद्यार्थ्यांना शिकवावे या संबंधी देखील सरकार योजना आखत आहे असे सुरेशकुमार यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षा केंद्रावर थर्मल स्कॅनरने तपासणी केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना समुदाय रेडिओ, व्हाट्सअप च्या माध्यमातून परीक्षेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे अशीही माहिती मंत्री सुरेशकुमार यांनी दिली.