स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या अनगोळ चौथ्या रेल्वे गेटपासून केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमार्गे बेम्को हायड्रॉलिक्स उद्यमबागपर्यंतच्या रस्त्यावरील रहदारी लक्षात घेऊन हा रस्ता 80 फुटाचाच ठेवावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी महापालिका आयुक्त आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे कार्यकारी संचालक जगदीश के. एच. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवशक्तीनगर, अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी बुधवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयात जाऊन उपरोक्त मागणीचे निवेदन कार्यकारी संचालक जगदीश के. एच. यांच्याकडे सुपूर्द केले. अनगोळ चौथ्या रेल्वे गेटपासून केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमार्गे बेम्को हायड्रॉलिक्स उद्यमबागपर्यंतचा रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
हा रस्ता 80 फुटाचा करावा असा प्रस्ताव होता. परंतु प्रत्यक्षात रस्ता करताना रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ आणि सायकल ट्रॅकसाठी जागा सोडण्यात आल्यामुळे मूळ रस्ता अवघा 30 फुटाचा झाला आहे. सदर रस्ता हा केएलई इंजीनियरिंग कॉलेजमार्गे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला जोडणारा आहे.
त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी आणि औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करणाऱ्या साध्या व अवजड वाहनांची गर्दी असते सदर रस्ता 80 फुटाचा असतानाच नागरिकांना या रस्त्यावर रहदारीच्या कोंडीचा त्रास होत होता. या भागात पार्किंगची सोय नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक आपली वाहने या रस्त्याकडेला पार्क करत असतात त्यामुळे हा 30 फुटांचा रस्ता आणखी अरुंद होणार आहे.
महानगरपालिकडून रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेताना शहरातील रस्ते 40 फूट, 60 फूट आणि 80 फुटाचे करण्यात आले आहेत मात्र अनगोळ चौथ्या रेल्वे गेट पासून ते बेम्को हायड्रॉलिक्सपर्यंतचा रस्ता मात्र 80 ऐवजी 30 फुटाचा करण्यात आला आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता पुरेसा रुंद करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर सदर रस्त्या संदर्भात आयुक्तांना माहिती दिली.