Sunday, January 26, 2025

/

लॉक डाऊन शिथिल झाला तरी, लघुउद्योग कामगार अद्याप अडचणीत!

 belgaum

कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉक डाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असला तरी या लॉक डाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या लोकांना अद्याप त्यांचा रोजगार पूर्ववत मिळालेला नाही. खास करून ग्रामीण भागातील कामगारांना सध्याच्या अयोग्य सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका बसत आहे.

सध्या ऑटोरिक्षा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. परंतु ऑटोरिक्षाचे भाडे कमी पगाराच्या अथवा रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी परवडणारे नाही. बंदी आदेशामुळे टमटम थोडक्यात वडाप वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या देखील पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. सद्यपरिस्थितीत अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत की चाकरमान्यांना आपले कर्तव्य बजावणे अवघड झाले आहे आणि पर्यायाने त्यांच्या दैनंदिन जीवनाचा तोल ढळला आहे.

बेळगावचे उद्योजक मुकुल चौधरी यांच्या म्हणण्यानुसार कामगारांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांना कामावर येण्याची इच्छा असूनही प्रवासी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्यामुळे हे कामगार कामावर येऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचेही नुकसान होत आहे आणि कंपनीही तोट्यात जात आहे. गेल्या 7 मे पासून सरकारने काही अटींवर उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थितरित्या सुरू केली नसल्यामुळे कामगारांना आपल्या रोजीरोटी पासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

 belgaum

चौधरी यांच्या फॅक्टरीत 30 महिला कामगार आहेत. ज्या शहराबाहेरील उपनगर आणि ग्रामीण भागातून कामासाठी येतात. सध्या सरकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अनियमितपणामुळे बऱ्याचदा चौधरी यांनाच स्वतःच्या वाहनाने संबंधित महिला कामगारांना कामावर आणावे लागत आहे.

सुप्रिया सावंत या वस्त्रोद्योगातील महिला कामगाराने सांगितले की, कामावर जाण्यासाठी पूर्वी मी टमटमला 10 रुपये देत होते. आता या टमटम अर्थात वडाप गाड्या बंद झाल्या आहेत. परिवहन मंडळाच्या बसेसही नाहीत. यामुळे सध्या कामावर जाण्यासाठी ऑटोरिक्षाला 20 ते 30 रुपये मोजावे लागत आहेत. हे जातानाचे घरी येतानाचे पुन्हा 20 ते 30 रुपये हा खर्च आमच्यासारख्यांना परवडणारा नाही, असे सुप्रिया म्हणाली.

बैलहोंगल तालुक्यातील मत्तिकोप गावचा रहिवासी बाळाप्पा दयाण्णावर हा बेळगाव कामाला आहे. दररोज 37 कि. मी. अंतराचा प्रवास करून त्याला कामाला जावे लागते. यापूर्वी तो सकाळी आठची बस पकडून 9 वाजता बेळगावातील आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होत होता. परंतु आता कामावर जाण्यासाठी त्याला तीन ते चार बसेस बदलाव्या लागत आहेत. त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन कामावर हजर होण्यास त्याला मोठा विलंब लागत आहे. सुप्रिया आणि बाळप्पा यांच्या प्रमाणेच शेकडो कामगारांना सध्या प्रवासी वाहतूक व्यवस्थाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या सर्वांनाच सध्या “कोरोना”चे संकट केंव्हा टळणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.