बेळगाव खडेबाजार पोलिसांनी सुपारी किलर म्हणून दोघा जणांना अटक केली आहे. या दोघा जणांनी बेळगाव सह महाराष्ट्रातही गुन्हे केले आहेत. नेमके बेळगाव ते भिवंडी आणि पुणे या भागात धुमाकूळ घालणाऱ्या टोळी मधील दोघांना अटक करण्यात आली खरी मात्र त्यांचे बेळगाव ते मुंबई कनेक्शन कशा पद्धतीने झाले हे देखील पोलिसांना माहिती झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील विशाल सिंग विजय सिंग चव्हाण 21 मूळचा राहणार चिकनंदिहल्ली तालुका बैलहोंगल सध्या राहणार शास्त्रीनगर व प्रथमेश नारायण गणिकोप वय 19 राहणार शास्त्रीनगर यांनी बेळगाव तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना धमकावण्यात सुरुवात केली होती. वारंवार आपले जागे बदलत ते पोलिसांना चकमा देत होते. मात्र खडेबाजार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यानच्या काळात 23 जानेवारी 2020 रोजी हुलबत्ते कॉलनी येथील मुकेश कामठे यांना धमकावण्यात आले होते. त्यानंतर हिंदू संघटनेचे अभिजीत भातकांडे यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांनी महाराष्ट्रात पलायन केले होते.
ही घटना ताजी असतानाच 20 ऑक्टोंबर 2019 रोजी ठाणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश उर्फ विजू गायकर यांच्या वर विशाल चव्हाणने भिवंडी जवळ गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून बेळगाव ते मुंबई कनेक्शन आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याने आपल्या कारवाया सुरू केल्या होत्या. बेळगाव येथे हल्ला करून फरारी झालेल्या विशाल चव्हाण याने महाराष्ट्रातील धुडगूस घालण्यास सुरुवात केली. त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव येथे खडेबाजार टिळकवाडी शहापूर कॅम्प या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातून आपल्या गुन्हेगारीची सुरुवात करून आज अनेकांना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्यांमुळे त्याचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे त्याचे बेळगाव ते मुंबई कनेक्शन उघडले आहे. अनेक पोलिस त्याच्या शोधात आहेत. आता महाराष्ट्र पोलीस त्याला ताब्यात घेणार असून त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे बेळगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.