मिरचीच्या दुकानाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील रविवार पेठेतील कांदा मार्केट येथे घडली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.
रविवार पेठेतील कांदा मार्केट येथील आपल्या दुकानाला आग लागल्याचे आज सकाळी निदर्शनास येताच मिरची दुकानाचे मालक आरजू गोकाककर यांनी त्वरित अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. दरम्यान आग झपाट्याने पसरल्याने मिरची दुकानाबरोबरच एक लहानसे कँटीन देखील जळाले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आपले अधिकारी बी. आर. टक्केकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्प्रयासाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
दुकानाला लागलेल्या आगीसंदर्भात माहिती देताना दुकान मालक आरजू गोकाककर यांच्या भावाने सांगितले कि, रविवारपेठेतील कांदा मार्केटमध्ये वारंवार चोरी तसेच अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या भागात पोलीस गस्त वाढवण्याची गरज आहे. या आगीचे नेमके कारण शोधून काढण्याचा आग्रह देखील त्यांनी केला. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शहरातील रविवार पेठ येथील कांदा मार्केटमध्ये चोरी तसेच आकस्मिक आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असून पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.