बेळगाव जिल्ह्यवर पुन्हा जारकीहोळी वर्चस्व सिद्ध झाले असून गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारचे मुख्य कार्यदर्शीनी हा आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी रमेश जारकीहोळी तर हासन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी के गोपालय्या यांची नियुक्ती झाली आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात रमेश जारकीहोळी यांनी पालक मंत्री पद भूषवले होते आता सरकार जरी बदललं असलं तरी रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवत आहेत.गेल्या सात वर्षाच्या रमेश जारकीहोळी किंवा सतीश जारकीहोळी असोत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद याच घराण्याकडे आहे.
रमेश जारकीहोळी यांच्या कडे जिल्ह्याची सूत्रे दिल्याने धारवाडचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची ते जागा घेणार आहे.राज्यसभा निवडणुकीत राजकारणात कत्ती आणि कोरे यांच्या लॉबिंग मध्ये उडी टाकत रमेश यांनी आणखी काँग्रेसचे 20 आमदार भाजपात आणू शकतो असा बॉम्ब टाकला होता.जनता दल काँग्रेसचे सरकार पतन करण्यात रमेश यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांना त्याच वेळी भाजप हाय कमांडने पालकमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार जारकीहोळी यांची पुन्हा एकदा पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे.