पहिल्या टप्प्यातील लॉक डाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे.
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या प्रसिद्धी पत्रकातील नियमांनुसार कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असेल. यामध्ये प्रवाशाच्या नांव, पत्ता, मोबाईल नंबर आणि अन्य आवश्यक माहितीचा समावेश असेल. यासाठी कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. एकच मोबाईल क्रमांक कौटुंबिक वगळता अन्य वेगवेगळ्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) चालणार नाही. व्यवसायिक/ व्यापारी प्रवाशांनी आपले नांव, मोबाईल क्रमांक व पत्ता ही माहिती देण्याबरोबरच ते कर्नाटकात कोणाला भेटायला आले आहेत? आणि केंव्हा परत जाणार? याचीही माहिती देणे आवश्यक आहे. संक्रमित प्रवाशांनी राज्यातील मुक्कामाच्या ठिकाणाचा पत्ता आणि कर्नाटकातून प्रस्थानाचा मार्ग सूचित करणे गरजेचे आहे. रस्तेमार्गासह हवाई आणि जलमार्गाने राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवासाची आरोग्य तपासणी केली जाईल त्याचप्रमाणे काॅरन्टाईन नियमानुसार प्रत्येक प्रवाशाच्या हातावर 14 दिवसांचा होम काॅरन्टाईनचा शिक्का मारला जाईल. आगमनाच्या ठिकाणी प्रवाशांची कोरोना तपासणी केली जाईल. या तपासणीत संबंधित प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याची आयसोलेशनसाठी रवानगी केली जाईल.
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि सात दिवसांचे होम काॅरन्टाईन सक्तीचे असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेले प्रवासी, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले, 60 वर्षावरील वयस्क नागरिक, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती आणि मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन माफ असणार आहे. मात्र संबंधितांना 14 दिवसाचे होम काॅरन्टाईन असेल. ज्यांना तातडीच्या कामासाठी कर्नाटकात येऊन परत जायचे असेल त्या प्रवाशांकडे आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे प्रवासापूर्वी दोन दिवस आधी दिलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. यासह अन्य नियमांचा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या प्रसिद्धीपत्रकात समावेश आहे. राज्याचे चीफ सेक्रेटरी टी. एम. विजय भास्कर यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
Gayatri Bajaj.